नांदेड : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे इंजेक्शन आणि खाटांचा प्रचंड तुटवडा आहे. याबाबत दररोज ओरड होत असल्याने प्रशासनाने आता खाटांच्या उपलब्धतेची माहिती मिळावी, यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष २४ तास उघडा राहणार आहे. जिल्ह्यात आजघडीला दहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर मृत्यूचा आकडाही हजाराच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत दररोज साधारणत: बाराशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एवढ्या रुग्णांना ठेवावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही खाटा मिळेना झाल्या आहेत. याबाबत बरीच आरडाओरड झाल्यानंतर आता प्रशासनाने खाटांची माहिती देण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ असा आहे. नागरिकांनी खाटांच्या माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षासाठी शंकर अरवदे, सदा कुलकर्णी, मनोज चौधरी, एम. एस. देशमुख, मयूर कांबळे, तुपकरे, एम. डी. जाधव, एम. एन. केंद्रे, डी. एस. कदम, आर. एल. आडे, आर. एल. ससाणे, व्यंकट पाटील, व्ही. एस. बोराटे, कैलास तिडके आणि डॉ. गिरीष बारडकर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खाटांच्या माहितीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:17 AM