नांदेड : प्रलंबित बिलाचे धनादेश देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच चालकामार्फत घेणाऱ्या जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्ह्यातील ५ संस्थांच्या बालगृहातील अनाथ, निराधार, निरासीत बालकल्याण सहाय्यक अनुदान प्रलंबित बिलाचे धनादेश देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी मंजूर रकमेच्या सात टक्केप्रमाणे लाच मागितल्याची तक्रार संस्था चालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १२ एप्रिल २०१९ रोजी केली होती़ या तक्रारीवरून १२ एप्रिल रोजी शास्त्रीनगर भागातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात केलेल्या पडताळणीदरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शाहू यांनी प्रलंबित रकमेच्या सात टक्के लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
या कारवाईत सोमवारी पुन्हा सापळा रचून शाहू यांना पाच संस्थांच्या बालगृहातील प्रलंबित बिलाच्या धनादेशासाठी २५ हजार रुपयांची लाच शासकीय वाहन चालक ज्ञानोबा रामचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते स्वीकारली़ ही रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले़ या प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल पोतन्ना शाहू आणि वाहन चालक ज्ञानोबा सूर्यवंशी यांच्याविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय लाठकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पो़ना़ हणमंत बोरकर, शेख चाँद, मारोती केसगीर, अमरजितसिंह चौधरी, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांनी केली़