सध्या जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. परंतु, ५ एप्रिलला लॉकडाऊन शिथिल होणार आहे. मात्र, ५ एप्रिलपासूनच उन्हातदेखील वाढ होणार आहे. नांदेडचा पारा ४४ ते ४५ अशांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काळजी घेणे त्याचबरोबर उष्माघात होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाययोजनाही प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
पुढील आठवड्यात घ्या विशेष काळजी
यंदाचा एप्रिल महिना तापदायक ठरणार आहे. त्यात हवामान अभ्यासकांनी ५ ते १६ एप्रिलपर्यंत उन्हाचा कडाका राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या काळात प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक दुपारी घराबाहेर पडू नये अथवा दुपारी उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये, यातून उष्माघाताची दाट शक्यता असते. या काळात तापमान ४५ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे स्वत:चे तसेच पशुपक्षी, जनावरे, पाळीव प्राणी, पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, असे आवाहन हवामान अभ्यासक बालासाहेब कच्छवे यांनी केले आहे.