- विशाल सोनटक्के
आजकाल प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. चिमुकल्या मुलांना तर या स्मार्ट फोनची इतकी सवय झाली आहे की, मोबाईलशिवाय त्यांना करमतही नाही. मुलांतील ही बेचैनी धोकादायक आहे. समुपदेशक डॉ. श्रीकांत भोसीकर यांच्याशी साधलेला संवाद.
प्रत्येकाला आपल्या हातात कायम मोबाईल असावा, असे वाटते. मात्र याच सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यात कितपत तथ्य आहे?स्मार्ट फोनने दाखवून दिले आहे की, मनुष्य किती वाहत जातो. आपण आपल्या आयुष्याचा भलामोठा कॅनव्हॉस सोडून पाच इंची स्क्रीनमध्ये अडकून पडलो आहोत. सध्या डिजिटल डिस्ट्रॅक्शनमुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अवघड झाले. त्यातून चिडचिडपणा निर्माण होऊन मानसिक ताण वाढत जातो.
मनापासून प्रयत्न केल्यानंतर मोबाईलपासून दूर जाता येईल काय ?लग्न जोडणाऱ्या स्मार्ट फोनमुळे काहींचे संसार कायमचे तुटल्याचीही उदाहरणे आहेत. नात्यांपेक्षा स्मार्ट फोन काहींना जास्त जवळचा वाटू लागला आहे. सोशली फार कनेक्टेड असणारे प्रत्यक्षात खूपच एकटे असल्याचे दिसते. आधी डेटा फ्री झाला आणि मग नाती सुद्धा. डेटा संपल्यानंतर रिचार्ज करता येईलही, परंतु नात्यांचे काय? त्यामुळे या संदर्भात ठोस पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. कोणतीही चांगली सवय लागायला प्रयत्न करावे लागतात आणि वेळही लागतो.
स्मार्ट फोनचा वापर कसा करायला हवा?स्मार्ट फोनचा वापर जाणीवपूर्वक करा. फोन कामासाठी हातात घेतला आहे, याचे भान ठेवले पाहिजे. काम संपल्यानंतर फोन दूर ठेवता आला पाहिजे. थोडावेळ जरी जास्त फोन हातात राहिला तर लगेचच इतर आॅनलाईन गोष्टीमध्ये आपण भरकटून जातो. मी पुन्हा सांगतो, स्मार्ट फोनचा वापर नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. आॅनलाईन न्यूज, न्यूजअॅपचा वापर थांबवा म्हणजे सतत ब्रेकींग न्यूजसाठी फोन घ्यावा लागणार नाही. त्यापेक्षा वर्तमानपत्र खरेदी करा, कामाची व खरी माहिती मिळेल.
संभाव्य धोके टाळण्यासाठी हे करायलाच हवे प्रत्येकाने दिवसातला काहीकाळ आपला फोन बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा. सुरुवात थोड्यापासून केली तरी चालेल. संध्याकाळी ठरावीक वेळेनंतरच फोन हातात घेण्याचे ठरवा. रात्री आठनंतर स्मार्ट फोनचा वापर फक्त कॉल करणे किंवा रिसीव्ह करण्यासाठी करा. सर्व नोटीफिकेशन, व्हायब्रेशन बंद करा. केवळ रिंगटोन चालू असावी म्हणजे तुमचे लक्ष प्रत्येकवेळी फोनकडे जाणार नाही. वापर नसलेले डाक्युमेंटस्, अॅपस् डिलीट करा. वॉकला जाताना फोन सोबत घेऊ नका. वेळ पाहण्यासाठी घडी वापरा. अलार्मसुद्धा वेगळा असू द्या.
ज्या तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटरचे अंतर कमी झाले. त्याच तंत्रज्ञानाने आपल्यासमोर बसलेल्या व्यक्तीतील अंतर वाढविण्याचे काम केले आहे. आजच्या दैनंदिन धावपळीतील मिळणारा वेळही आपण मोबाईलमुळे कुटुंबाला देत नाही.