नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मावळ्यांनी बलिदान देण्याची घाई करू नये़ अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २ आॅगस्ट रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आ. चिखलीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ आरक्षणाच्या मागणीला आपलाही पाठिंबा असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले़ मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे़ नांदेड जिल्ह्यातही समाजाच्या भावनेचा उद्रेक झाला आहे़ आरक्षणाच्या मागणीसाठी ३० वर्षापासून मराठा समाज संघर्ष करीत आहे़ प्रत्येकवेळी आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्षच केले़
शहानिशा करून गुन्हे नोंदवावी मराठा आरक्षणासह धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही तत्काळ मार्गी काढावा अशी आपली मागणी आहे़ मराठा समाजाच्या आंदोलनात काही विध्वंसक शक्ती शिरल्या असून निरपराध लोकांना त्याचा त्रास होत आहे़ आंदोलनाचे गुन्हे दाखल करताना शहानिशा करूनच प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली
आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, शासकीय मालमत्तेचे कोणीही नुकसान करू नये, आपला जीव गमावू नये, आणखी थोडेदिवस वाट पहा, हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असेही आज चिखलीकर म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील़ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचेही ते म्हणाले़
राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत आरक्षणाच्या मागणीसाठी आपण राजीनामा देणार काय, या प्रश्नाच्या उत्तरावर ते म्हणाले, विधान मंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे़ विधान मंडळातच सर्व प्रश्न सोडवता येतात़ राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले़
श्रेयाच्या लढाईसाठी चढाओढमराठा आरक्षणाचा प्रश्न १९ जुलै रोजी विधान मंडळात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला़ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांनी या चर्चेत भाग घेतला होता़ त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात आरक्षणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली़ तसेच आणखी काही सूचना असतील तर सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते़ यावेळी विधान मंडळात एकाही सदस्याने मत मांडले नाही़ अधिवेशन संपल्यानंतर मात्र आंदोलन केले जात आहे़ श्रेयवादासाठी हे आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले़