नांदेड : पाेलीस अंमलदारांच्या साप्ताहिक, वैद्यकीय व इतर प्रासंगिक सुट्या काेणत्याही परिस्थितीत थांबवू नका, असे स्पष्ट आदेश राज्याचे पाेलीस महासंचालक संजय कुमार पांडेय यांनी दिले आहेत. महासंचालक पांडेय हे आपल्या साप्ताहिक कामकाजाचा लेखाजाेखा प्रत्येक आठवड्यात साेशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करतात. यावेळी राज्यभरातील पाेलीस अधिकारी, कर्मचारी आपल्या व्यथा ऑनलाईन त्यांच्याकडे मांडतात. सातत्याने थेट महासंचालकांकडे मांडल्या जाणाऱ्या समस्यांचा ओघ पाहता पांडेय यांनी राज्यातील सर्व पाेलीस घटक प्रमुखांना नियमित पाेलीस दरबार भरविण्याचे आदेश दिले आहेत.
सुट्या मिळत नाहीत ही पाेलीस अंमलदारांची नेहमीची समस्या आहे. त्यावर ताेडगा काढण्यासाठी महासंचालकांनी राज्यातील सर्व पाेलीस उपअधीक्षक (गृह), राखीव पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांची बैठक घेतली हाेती. त्यात अंमलदारांच्या सुट्या मंजूर कराव्या, असे सांगितले हाेते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी खालपर्यंत हाेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुट्यांची ही समस्या सुटली नसल्याने महासंचालकांकडे यासंबंधीच्या तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत. एका जिल्ह्यात तर सीक पासही दिली जात नसल्याची तक्रार आली. त्या पार्श्वभूमीवर महासंचालक पांडेय यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यात अंमलदारांच्या सुट्या काेणत्याही परिस्थितीत थांबविल्या जावू नयेत, शक्य असेल तेवढ्या सुट्या दिल्याच पाहिजे, असे आदेश जारी केले. या कर्मचाऱ्यांच्या सुट्या थांबवून फार काही साध्य हाेणार नाही, असेही महासंचालकांनी स्पष्ट केले.
कुटुंबातच कारवाई कशी करणार?पाेलीस अंमलदारांच्या सुट्या राेखल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा आपण दिला हाेता. मात्र, आपल्याच कुटुंबातील कुण्या सदस्यावर कारवाई करण्याची आपली मानसिकता नाही, त्यातून काही साध्य हाेणार नाही, तशी वेळही आपल्यावर आणू नये, असे महासंचालक पांडेय यांनी सांगितले.
अंमलदारांनीच हाताळल्या दंगलीमहासंचालक संजय कुमार पांडेय यांनी सांगितले की, अलीकडेच अमरावती, नांदेड, मालेगाव येथे दंगली उसळल्या हाेत्या. या दंगली पुढे आणखी पसरवू न देता त्या नियंत्रित करण्याची जबाबदारी पाेलीस अंमलदारांनीच यशस्वीपणे पार पाडली. मी स्वत: कॅबीनच्या बाहेर निघालाे नाही, काही घटक प्रमुखही कक्षातच राहिले, त्यानंतरही दंगल नियंत्रित झाली, ती अंमलदारांच्या परिश्रमामुळेच, असेही महासंचालकांनी सांगितले.