नांदेड- गावातून बाहेर पडण्यासाठी नाल्यावर पुल आणि रस्ता नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गांधीनगर ची ही दयनीय अवस्था आहे.
पाचशे लोकसंख्येच हे गाव आहे. गांधीनगर ते धानोरा मध्ये छोट्या नदिसारखा नाला आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यावर गांधीनगर चा संपर्क तुटतो. पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी याच नाल्याच्या पाण्यातून विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन किलोमीटर रस्ताही नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. गावात कुणाचा मृत्यू झाला तर अंत्ययात्र ही पाण्यातून काढावी लागते. पाण्यातून नाला पार करताना अनेक दुर्घटनाही झाल्या आहेत. नाल्यावर पुल आणि दोन किलोमीटर चा रस्ता करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, आमदार, खासदार सर्वांकडे पाच वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा केला पण कुणीही दखल घेतली नाही.