नांदेड : लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत देशमुख कॉलनी येथे एका डॉक्टरने पैशाच्या वादातून जि़प़ माजी सदस्याची हत्या केली़ घटनेनंतर डॉक्टरने स्वत:च भाग्यनगर ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना आज सकाळी घडली़
नांदेड-लिंबगाव रस्त्यावर जि़प़चे माजी सदस्य दिनकर शेवाळे यांचे घर आहे़ जवळपास वर्षभरापूर्वी शेवाळे यांना डॉ.अविनाश शिंदे यांनी गुंतवणुक करण्यासाठी ४५ लाख रुपये दिले होते़ परंतु शेवाळे यांनी त्यांच्या पैशाची गुंतवणुकही केली नाही आणि परतही केले नाही़ शिंदे ज्या-ज्या वेळी त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचे त्या-त्या वेळी शेवाळे यांना अॅट्रासिटी करण्याची धमकी द्यायचे़ त्यामुळे शिंदे यांची आर्थिक परिस्थिती नाजुक झाली होती़ गेल्या काही महिन्यापासून ते त्याच तणावात होते़ शेवाळे यांना धडा शिकविण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी शेवाळेवर पाळत ठेवली होती
आज सकाळी शेवाळे हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घराचा एक दरवाजा उघडा असल्याची संधी साधत, डॉ. शिंदे त्यांच्या घरात शिरले़ झोपेत असलेल्या शेवाळेवर त्यांनी चाकुने सपासप वार केले़ शेवाळे यांना रक्ताच्या थारोळ्यात तसेच सोडून डॉ. शिंदे थेट भाग्यनगर पोलिस ठाण्यात आले़ या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या अधिकार्यांसमोर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली़ त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के आणि पो.नि.चंद्रशेखर कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेवाळेंचा जागीच मृत्यू झाला होता.
सदरील गुन्ह्याबाबत लिंबगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यात आणखी एकाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ शेवाळे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन अपत्ये असल्याचे दाखवून निवडणुक लढविली होती़ या प्रकरणी एक गुन्हा त्यांच्यावर प्रलंबित आहे़ एका खून खटल्यातूनही त्यांची सुटका झाली आहे.