नांदेड : कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालये, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून बंदच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून होणारे रक्तदान शिबिरांचे आयोजनही ठप्प पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच आता कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे; परंतु पहिला डोस घेतल्यानंतर साधारणता दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करण्याची गरज आहे. जेणेकरुन गरजूंना वेळेत रक्त मिळेल.
गेल्या वर्षभरापासून रक्तदान शिबिरे बंदच आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनाच डोनर शोधण्याची वेळ येत आहे. डोनर असल्याशिवाय रक्त मिळेल दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी नातेवाईकांची धावपळ उडते. त्यातच कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर दिला होता. दुसरा डोस घेतल्यानंतर साधारणत: २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. हा सर्व कालावधी जवळपास दोन महिन्यांचा होता. त्यामुळे या काळात रक्ताचा तुटवडा जाणवेल.