नांदेड : भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता. दोन वर्षापासून कर्जमाफीची अंमलबजावणी केली जात असल्याची टीका खा. अशोकराव चव्हाण यांनी नायगाव येथे केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. चव्हाण यांनी नायगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले, ही लोकसभा निवडणूक धर्मनिरपेक्षतावादी विरुद्ध जातीयवादी अशीच होत आहे. मोदी सरकारने जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण केले. अनेक बळीही जातीयतेतून घेण्यात आले. त्याचवेळी साम, दाम, दंड, भेद नीतीचाही अवलंब करण्यात आल्याची टीका चव्हाण यांनी केली. भाजपाचे जुमलेबाज सरकार असल्याची टीका करताना १० कोटी नोकऱ्यांचे खोटे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले.नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपाने उमेदवार लादला आहे. या दलबदलू उमेदवाराला धडा शिकविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, संस्था बंद पाडणारे आज भाजपात मिरवत आहेत. स्वत: कारखाने बंद पाडून कारखाने आपण बंद पाडल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मुख्यमंत्री असताना शेतकरी व ठेवीदारांचे पैसे बुडू नये यासाठी जिल्हा बँकेला १०० कोटींची मदत केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.गावपातळीच्या कार्यकर्त्यांनी बाजार बुणग्यांची काळजी न करता आप-आपले बुथ सांभाळावे. आपण पाठीशी रहा, मी अख्खा महाराष्ट्र सांभाळतो, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. वसंत चव्हाण यांनीही विरोधकांनी जातीभेदाच्या वावड्या उठवल्या आहेत. ज्या पक्षात आपण काम करतो तीच आपली, खरी जात आहे. सोईरपण आणि जातीपेक्षा पक्ष मोठा आहे. दिलेला शब्द पाळणे हे नायगावकरांचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्ता आणि पद भोगणाऱ्यांनी गद्दारी केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांना साथ देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेस पक्ष एक मोठी रेल्वेगाडी आहे. या रेल्वेत अनेकजण बसतात आणि अनेकजण उतरतात. उतरणाऱ्यांची दखल घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास माधवराव बेळगे, माजी जि.प. अध्यक्ष रावसाहेब मोरे, मोहन पाटील धुप्पेकर, विजय चव्हाण, संजय बेळगे, श्रीनिवास पाटील, आनंद चव्हाण, संभाजी भिलवंडे, मनोहर पवार, सय्यद रहीम, केशवराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, दत्ता पाटील होटाळकर, स. इसाक, संजय पाटील शेळगावकर, अनिल कांबळे, सुधाकर शिंदे, मिनाक्षी कागडे, बालाजी मिरकुटे, श्रीमती कमटेवाड, वंदना पवार, अनुसया मद्देवाड, सुरेखा भालेराव, भाई मांजरमकर, शिवाजी कागडे, रविंद्र भालेराव, इसाद नर्सीकर, जगदीश कदम, एस.एम. मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.
जाती, धर्माच्या राजकारणाला थारा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:24 AM
भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता.
ठळक मुद्देनायगाव येथे अशोकराव चव्हाण यांचा आरोप दोन वर्षानंतरही कर्जमाफीची पूर्णपणे अंमलबजावणी नाही