शहरातील नवा मोंढा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी संघटनेची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रारंभी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे कै. जयसिंगराव घनवट यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
या बैठकीला ग्रामीण भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागात अवैध धंद्यांना ऊत आला असून, प्रत्येक गावात देशी दारूचा पूर वाहत आहे. तर मटका आणि जुगार या धंद्यानेदेखील जम बसवला असून, शेतकरी आणि शेतमजुरांना मारणारे हे धंदे जिल्हा पोलीस प्रशासनाने बंद करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. परिणामी या अवैध धंद्याचा सर्वात त्रास आमच्या शेतकरी माय-बहिणीला सहन करावा लागत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
हदगाव येथे ९ जानेवारी रोजी शेतकऱ्यांचा जागर मेळावा होत असून हा मेळावा जिल्ह्यापुरता नसून, मराठवाड्यातील अनेक कार्यकर्ते आणि वक्ते या कार्यक्रमाला हदगाव येथे येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीला ॲड. धोंडिबा पवार, व्यंकटराव वडजे, रामराव कोंडेकर, किशनराव पाटील आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले, तर जिल्ह्यातील अवैध धंद्यापासून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांना वाचविण्यासाठी आपण जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी केले.