जिल्ह्यातील सुमारे १५० शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमी भावाने हरभरा खरेदी केला जात आहे. आतापर्यंत या कंपन्यांनी १० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचले आहेत. पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी मार्केट वाॅर्डमध्ये किंवा खाजगी व्यापाऱ्यांकडे शेतकरी पिकविलेला माल विकत होते. मोजमाप, हमाली खर्च, वाहतूक खर्चही आपल्याच मिळकतीतून द्यावा लागत होता.
मात्र ज्या ज्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होऊन त्यांना नाफेड दर्जा मिळाला, अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार बंद झाले आहेत. नाव नोंदणी केल्यानंतर शेतकरी माल घेऊन येतात. त्यांना मॅसेज पाठिवले जातात. बिल अपलोड केल्यानंतर माल वखार महामंडळाकडे पाठविला जातो. पावती नाफेडला पाठविल्यानंतर ऑनलाइन पोर्टलद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सोपी ठरत आहे.
जीवनमान उंचावण्यासाठी फलदायी
शेतकरी उत्पादक कंपनीमुळे आता ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाले असून, हमी भावामुळे त्यांची आर्थिक बाजू बळकट होण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना माल खरेदी केल्यानंतर त्यांना पैसेही वेळेत मिळत आहेत. एकंदरीत शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणाऱ्या ठरत आहेत.