नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर मंगळवारी अत्यवस्थ असलेल्या आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार बालकांचाही समावेश आहे. दोन दिवसांत तब्बल ३१ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर अत्यवस्थ असलेले ६३ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत.
या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची आहे. परंतु आजघडीला या ठिकाणी १२०० हून अधिक रुग्ण दाखल आहेत. नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम आणि शेजारील तेलंगणा राज्यातून दररोज मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. परंतु औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागते. सलाईन, सिरींज, रेबीज, सर्पदंश यासारखी औषधेही बाहेरून आणावी लागतात.
स्थानिक प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी ४० लाख रुपयांची औषधी खरेदी करण्यात आली होती. परंतु या औषधाचा साठाही आता संपत आला आहे. तर दुसरीकडे परिचारिकांच्या १०० वर जागा रिक्त आहेत. सिटी स्कॅन, सोनोग्राफी बंद आहेत. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. त्यातच २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अत्यवस्थ असलेल्या ७० रुग्णांपैकी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. मंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.
अत्यवस्थ असलेल्या ‘त्या’ ६३ रुग्णांचे काय?रुग्णालयात अद्यापही ६३ अत्यवस्थ रुग्ण आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या रुग्णांचा जीव वाचविण्यास प्राधान्य द्या, त्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात येऊन सेवा देण्याचे आवाहन केले आहे. परंतु संवेदनशून्य रुग्णालय प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही म्हणावी तशी खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येते. ६३ अत्यवस्थ रुग्णांपैकी मंगळवारी सात जणांचा मृत्यू झाला.
अधिष्ठातांना स्वच्छ करायला लावले शौचालयहिंगाेलीचे एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी दुपारी रुग्णालयाला भेट दिली. अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना घेऊन त्यांनी अनेक वाॅर्डांची पाहणी केली. यावेळी जागोजागी अस्वच्छता दिसून आली. बालरोग अतिदक्षता विभागात तर चक्क तीन शौचालये कुलूपबंद होती. तर दोन शौचालयांत पाणी नसल्यामुळे घाण पसरली होती. यावेळी खासदार पाटील यांनी अधिष्ठातांच्या हाती झाडू देत त्यांना शौचालय साफ करण्यास भाग पाडले. तसेच या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
विद्यार्थी करणार कामबंद आंदोलनखासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठातांना शौचालय स्वच्छ करायला लावल्याची बाब कळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी अधिष्ठाता कार्यालयाजवळ जमले होते. त्यांनी या कृतीचा निषेध करीत बुधवारी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शरद पवार गटाने मुश्रीफांचा ताफा रोखलाशासकीय रुग्णालयात पाहणी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे वाहनाने विश्रामगृहाकडे निघणार होते. त्याचवेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा रोखला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.