नांदेड : राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड ते जालना या २०० कि.मी. लांबीच्या द्रूतगती जोड महामार्गाच्या कामासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यामुळे नांदेड जिल्हा थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने जिल्हावासीयांचे दळणवळण सुलभ होणार आहे.
याबरोबरच नांदेड ते मुंबई तसेच औरंगाबाद प्रवासासाठी वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे माल वाहतूकही अधिक वेगवान होणार असून समृद्धी महामार्गाची थेट जेएनपीटीपर्यंत कनेक्टीव्हीटी राहणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होणार असून यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड शहराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला होता. चव्हाण यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्त्वता मंजुरी दिली होती. बांधकाममंत्री चव्हाण यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेस आला होता.
आता अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद केल्याने नांदेड समृद्धीशी जोडण्याच्या संकल्पनेला गती येणार आहे. या उपक्रमांतर्गत समृद्धी महामार्गावरील जालना टी पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रूतगती मार्गाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाची वेगवान कनेक्टीव्हीटी मिळेल. या प्रकल्पामुळे नांदेड-औरंगाबाद तसेच नांदेड-मुंबई या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचणार आहे. जालना ते नांदेड द्रूतगती मार्गाची एकूण लांबी १९४ कि.मी. आहे. या द्रूतगती महामार्गाच्या बांधकामासाठी तांत्रिक, अभियांत्रिकी सविस्तर प्रकल्प अहवालालाही यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने नांदेड जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमीत कमी वेळेत पोहचविता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापार, उद्योगालाही गती मिळणार आहे.
नांदेड शहरातील रस्त्याचेही रूपडे पालटणारनांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टीव्हीटी लिंकचा भाग म्हणून नांदेड शहरातही रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूरनाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) या रस्त्यांची सुधारणा, उड्डाणपूल व देगलूर नाक्यानजीक गोदावरी नदीवरील पुलाचे कामदेखील या प्रकल्पाचा भाग म्हणूनच केले जाणार आहे. यासाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने नांदेड शहरातील रस्त्याचे रूपडेही बदलणार आहे.