नांदेड : जिल्ह्यात मुखेड, देगलूर आणि उमरी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी १४ मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून बिलोली, लोहा, हदगाव, किनवट, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यांतील मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात यापूर्वी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर आणि उमरी या तीन तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्येही जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले होते. या कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय ६ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने घेतला आहे.
बिलोली तालुक्यातील बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर, लोहा तालुक्यांतील लोहा, हदगाव तालुक्यातील मनाठा, किनवट तालुक्यातील इस्लापूर, जलधारा, शिवणी, धर्माबाद तालुक्यातील करखेली, जारीकोट आणि नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी व मांजरम या महसुली मंडळात मंगळवारी दुष्काळ घोषित करण्यात आला.
मुखेड, उमरी आणि देगलूर या तीन तालुक्यांसह उपरोक्त १४ मंडळांत दुष्काळ घोषित केल्याने महसूल मंडळात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या वीज कृषिपंपाची जोडणी खंडित न करणे अशा सवलती मिळणार आहेत.