लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावांना विविध सवलती लागू केल्या आहेत.महसूल व वन विभागाचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०१८ अन्वये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील- १२६, लोहा- १२७, हदगाव- १४५, हिमायतनगर- ६४, किनवट- १९१, माहूर- ९२, देगलूर- १०८, मुखेड- १३५, बिलोली- ९१ तर नायगाव तालुक्यांतील ८९ याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने गावांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाची पुनर्रचना, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यासह रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. त्याचप्रमाणे आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर तसेच टंचाईग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे.दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांतील गावांतील खातेदारांना टंचाईसंदर्भात शासनाच्या प्रचलीत धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात १ हजार १६८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:32 AM