नांदेड : कोरोनाकाळात जिल्ह्यात सर्वत्र गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या वेगवेगळ्या जाहिराती, डॉक्टरांचे व्हिडिओ यांसह इतर यूट्यूबवर सर्च करून अनेक नागरिकांनी चिठ्ठीशिवायच औषधे खरेदी केली. यातील काही औषधांमुळे त्यांना बरेही वाटत असले तरी, काहीजणांवर त्याचा दुष्परिणामही झाला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषध देऊ नये, असा नियम असताना नांदेड जिल्ह्यात मात्र सर्रासपणे औषधांची विक्री करण्यात येते. मोबाईलवर फोटो दाखवून अनेकजण औषधांच्या दुकानांतून ही औषधे खरेदी करतात. त्यामागील कारणेही तशीच आहेत. डॉक्टरांकडे गेल्यानंतर साधारणत: दोनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयापर्यंत तपासणी फी आहे. त्यापेक्षा कमी पैशांत ही औषधे घेतात.
कोरोनाकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरांकडे कोण जाणार?
n सर्दी, खोकला, अंगदुखी, मळमळ होणे यांसारखा त्रास होता. अशा किरकोळ आजारासाठी डॉक्टरांकडे जाणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे औषधविक्रेत्यांच्या सल्ल्याने अनेकजण औषधे खरेदी करतात. त्यात टीव्हीवरील जाहिराती पाहूनही अनेकजण कोणत्या आजारावर कोणती औषधी घ्यावीत, हे ठरवितात.
डॉक्टर लेन
शहरातील डॉक्टर लेन भागात औषध विक्रेत्यांची अनेक दुकाने आहेत. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. यांतील अनेक रुग्णांजवळ डॉक्टरांची चिठ्ठी नसते. त्यामुळे कुणाच्या तरी सल्ल्याने ते औषधे खरेदी करतात. डाॅक्टरांचा सल्ला घेण्यापुरते पैसेही त्यांच्याजवळ नसतात.
शिवाजीनगर
शिवाजीनगर भागातही अनेक रुग्णालये आहेत. या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक आहे. तसेच हे शहराच्या मुख्य भागात असल्यामुळे औषधांची दुकानेही जास्त आहेत. या ठिकाणीही नागरिक डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायच औषधी खरेदी करतात. कोरोनाकाळातही असाच प्रकार घडला आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विक्री करू नये याबाबत औषध विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने वेळोवेळी दुकानांची तपासणी करण्यात येते. औषध विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून विक्री केलेल्या औषधांचा डाटा अपडेट ठेवावा.
- अन्न व औषध प्रशासन