नांदेड : शहरातील वर्कशॉप भागातील एसटीच्या विभागीय कार्यालयाशेजारी राहत असलेल्या आसिफ पठाण नामक तरुणाने घराच्या भिंतीजवळ कचरा जाळल्याच्या क्षुल्लक कारणावरुन डबल बोअर बंदुकीतून गोळी झाडली़ यावेळी एसटी कार्यालयातील सुरक्षा रक्षक व इतर तीन कर्मचाऱ्यांसोबत त्याची झटापट झाली़ सुदैवाने गोळीमुळे कुणी जखमी झाले नाही. त्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत बसून जवळपास अर्धा तास हा तरुण पोलिस आणि नागरीकांना पकडण्याचे आव्हान देत होता.
वर्कशॉप भागात वक्फ बोर्डाचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एऩडी़पठाण यांची तीन मजली इमारत आहे़ सध्या या ठिकाणी नुकताच अमेरिकेहून परत आलेला त्यांचा मोठा मुलगा आसिफ पठाण हा राहत होता़ या इमारतीच्या पाठीमागील बाजूस एसटीचे विभागीय कार्यालय आहे़ शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन केले आहे़ त्यासाठी परिसराची स्वच्छता करुन एका कोपऱ्यात तो कचरा जाळण्यात येत होता़ कचऱ्याचा धूर पठाण यांच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत जात होता़ त्यामुळे संतप्त झालेला आसिफ पठाण हा हातात दोन बोअरची बंदुक घेवून एसटी कार्यालयाच्या आवारात आला़ या ठिकाणी कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत त्याने वाद घालत बंदुक त्यांच्या दिशेन रोखून धरली होती़
यावेळी सुरक्षा रक्षक संभाजी सावंत व इतर कर्मचाऱ्यांनी आसिफला पाठीमागून धरले़ या झटापटीत बंदुकीतून एक गोळी सुटली़ गोळीच्या आवाजाने कार्यालय परिसरात धावपळ उडाली़ परंतु त्यानंतरही सुरक्षा रक्षक व काही कर्मचाऱ्यांनी हिमंत दाखवित आसिफला पकडले होते़ यावेळी आसिफने उलट्या बंदुकीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करुन आपली सुटका करुन घेतली़ यावेळी एसटीच्या कर्मचाऱ्यांसोबत त्याचा वादही झाला़ त्यानंतर हातात बंदुक घेवून तो चालत एसटी कार्यालयाच्या आवारातून घरी गेला़ घरात गेल्यानंतर थेट दुसऱ्या मजल्यावरील खिकडीत जावून बसला़ या सर्व थरार सुरु असताना रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़ यावेळी नागरीकांनी आसिफला खाली येण्यास सांगितले़ परंतु तो नागरीकांनाच वर येण्यास सांगत होता़ थोड्याच वेळाच भाग्यनगरचे पोलिसही घटनास्थळी पोहचले़ पोलिसांनी आसिफला खाली येण्याचे आवाहन केले़ पोलिसांना पाहताच आसिफने तुम्हाला काही करणार नाही असे म्हणत वर येण्यास सांगितले़ त्यानंतर समोरील बाजूच्या दरवाजाने काही कर्मचारी दबकतच मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचले़ त्यानंतर आसिफने स्वताहा दरवाजा उघडत स्वताला पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी त्याच्याजवळील बंदुक जप्त केली़
अमेरिकेत होता नोकरीलाआसिफ पठाण हा बी़ई़इलेक्ट्रीक असून गेल्या अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी अमेरीकेत होता़ काही दिवसापूर्वीच तो नांदेडात आला होता़ वडीलांच्या नावे असलेल्या तीन मजली इमारतीत तो एकटाचा राहत होता़ त्याचे वडील एऩडी़पठाण हे वक्फ बोर्डाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते़ लाचप्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली होती़ त्यावेळी पठाण यांच्या नावे असलेली सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती़ त्याचबरोबर त्यांचे खातेही गोठविण्यात आले होते़ त्यामुळे आसिफलाही गेल्या काही वर्षापासून आर्थिक चणचण भासत होती अशी प्रतिक्रिया त्याच्या शेजाऱ्यांनी दिली़
सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांनी दाखविली हिंमतआसिफ हा हातात बंदुक घेवून शिवीगाळ करीत एसटीच्या कार्यालयाच्या परिसरात आला़ त्यावेळी आसिफने हातातील बंदुक कचरा जाळणाऱ्यांच्या दिशेने रोखली होती़ ही लक्षात येताच सुरक्षारक्षक संभाजी सावंत यांनी त्याला मागाहून पकडले़ परंतु एकट्या सावंत यांच्यावर तो भारी पडत असताना इतर कर्मचारीही सावंत यांच्या मदतीला धावले़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़