देगलूर (नांदेड ) : तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी ४८.३७ टक्के काढण्यात आली. त्यामुळे दुष्काळावर शिक्कामोतर्ब झाले आहे़ प्रशासनाने अंतिम आणेवारी वस्तुस्थितीला धरुन काढल्याने शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात यावर्षी पाऊस अवकाळी पावसासारखाच पडत राहिला. खरीप पिकाला तेही विशेष करून मूग, उडीद, सोयाबीन या नगदी पिकाला दर चार-पाच दिवसांत हलका स्वरूपाचा का होईना पाऊस लागतो. मात्र वारंवार पावसाने पाठ फिरविली. जेव्हा पावसाची अत्यंत आवश्यकता होती. तेव्हा तर पावसाने अवकृपाच दाखवली. वेळ निघून गेल्यावर पाऊस पडला. परिणामी मूग व उडीद फक्त डाळीपुरते शेतक-यांच्या हाती लागले. सोयाबीनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक होता. सोयाबीनचा खर्च व त्यामानाने झालेले अत्यल्प उत्पादन व न परवडणारा भाव यामुळे सोयाबीनच्या राशी करणेसुद्धा महागात पडले होते.
देगलूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून कापसाची लागवड करणे म्हणजे शेतक-यांना कर्जदार होण्यासारखे झाले आहे. असे असतानासुद्धा नाईलाजास्तव शेतक-यांनी कापसाची लागवड केली. मात्र निकृष्ट दर्जाचे बियाणे, पावसाने मारलेली दडी, प्रतिकूल हवामान त्याचबरोबर कापसावर पडलेली बोंडअळी यामुळे एक - दोन वेचणीतच कापसाच्या पहाट्या शिल्लक राहिल्या. कापसाला लागणारी भरमसाठ लागवड व अनेक वर्षांपासून त्याच- त्या बियाणामुळे उत्पन्न नाममात्र व दरवर्षी कमी मिळणारा भाव या बाबींमुळे कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मागील चार वर्षांपासून तालुक्यात कोणत्या ना कोणत्या दुष्काळाला शेतक-यांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी तूर तरी पिकेल असे वाटत असतानाच सतत ढगाळ वातावरणामुळे तुरीचेही उत्पन्न शेतक-यांच्या हाती लागणार नाही. एकंदरीत सर्वच पिके गेल्याने शेतकरी हताश झाला होता.
मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांना विमा मिळणार ?तालुक्यातील मुगाची सरासरी अंतिम आणेवारी ४८़४५ टक्के, उडदाची ४८़६८ टक्के, सोयाबीनची ४६़४४ टक्के, कापसाची आणेवारी ३६़४९ टक्के, तुरीची ६१़६६ टक्के, आणि खरीप ज्वारीची ४५़४३ टक्के काढण्यात आली आहे. अंतिम आणेवारी ४८़३७ टक्के काढल्याने ज्यांनी मूग, उडीद, सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला होता त्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे.महसूल प्रशासनाने नजर आणेवारी ५७़५५ टक्के तर सुधारित आणेवारी ५३़४७ टक्के काढल्याने शेतक-यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अंतिम आणेवारी तर वस्तुस्थितीला धरुन काढावी अशी शेतक-यांची मागणी होती. आ. सुभाष साबणे यांनीही महसूल प्रशासनाने ५० टक्क्यांच्या खाली आणेवारी काढावी अशी मागणी केली होती. तहसीलदार महादेव किरवले यांनीही अंतिम आणेवारी काढताना नेमकी वस्तुस्थिती पाहूनच आणेवारी ४८़३७ टक्के काढली आहे.