कंधार ( नांदेड ) : शहराचा कायापालट करून सुंदर शहराचे स्वप्न मृगजळ ठरत आहे. आ. प्रताप पा. चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्यातील टोकाचे राजकारण विकासाचा खेळखंडोबा करणारे ठरत आहे, अशी भावना शहरात पसरल्याने विकासाचा वेग कधी वाढणार, असा सवाल केला जात आहे़
कंधार ऩप़ निवडणूक अतिशय अटीतटीची झाली़ मतदारांनी आ़ प्रताप पाटील चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांना नाराज केले नाही़ विकासासाठी सतर्क असणा-या नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले़ तर आ. चिखलीकर समर्थक १० जण निवडून दिले़ काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत न राहता वैेयक्तिक राजकीय अस्तित्वाच्या लढाईचे स्वरूप या निवडणुकीला आले होते. विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़
व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा इ. प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे. दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही़ जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे. तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का? असा प्रश्न पडला आहे़विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते़, परंतु निधी असताना विकास साधता येत नसल्यास दोष कोणाचा, हा खरा प्रश्न आहे.
राज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली असताना टोकाचे राजकारण विकासकामाच्या आड येणे, ही शहरवासियांना खटकणारी बाब ठरत आहे़ सर्वांगसुंदर शहर विकास टोकदार राजकारणात अडकला आहे़ आ़प्रताप पाटील चिखलीकरांना मतदारसंघाकडे लक्ष पुरवून २०१९ ची निवडणूक लढवायची आहे़ शहर विकासाचे मॉडेल विधानसभा मतदारसंघात रुजविण्यासाठी उपयोगात आणण्याची गरज आहे. त्यासाठी येथील कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिका-यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न आ. चिखलीकरांनी करणे गरजेच आहे़ अरविंद नळगे यांनीही विकासासाठी एक पाऊल मागे घेणे निकडीचे आहे़ अशी राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहे़ दोन्ही नेत्यांनी एकत्रित न येता टोकाची भूमिका कायम ठेवल्यास आगामी काळात राजकीय किंमत चुकवावी लागण्याचा धोका असून शहर विकासाचा वेगही दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत.
व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा आदी प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे़ दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही. जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे़ आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे़ तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का, असा प्रश्न पडला आहे.