- विशाल सोनटक्के नांदेड : इयत्ता अकरावी-बारावीचे अनेक विद्यार्थीमहाविद्यालयात न जाता खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.नांदेडसह लातूर जिल्ह्यात खाजगी क्लासेसचा बोलबाला आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतलेली असून कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्यास सुरुवात केली आहे. उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश झाले आहेत का, हे या माध्यमातून तपासण्यात येणार आहे. कमीत कमी चार भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने बजावले आहेत.शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांचा त्यात समावेश असेल. संच मान्यतेनुसार मंजूर तुकड्या, अधिकतम प्रवेश क्षमता, शाखानिहाय दिलेले प्रवेश तसेच प्रवेशानुसार विद्यार्थी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहतात का? याची पडताळणी हे पथक करेल. ज्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक मुलांना प्रवेश दिल्याचे स्पष्ट होईल, अशा उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयांंची यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यात येणार असून विभागीय उपसंचालकांमार्फत ती यादी शासनाकडे जाणार आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश; विद्यार्थ्यांना परीक्षेस मज्जावक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी त्यांच्या स्तरावरुन अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ रद्द करायचे आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना सोयीनुसार नजिकच्या मंजूर प्रवेशित क्षमतेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांना प्रवेश घेण्यास सांगावे. एखाद्या विद्यालयाने क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिलेले असल्यास विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेस बसता येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
खासगी क्लासेसमुळे महाविद्यालये ओस!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 5:20 AM