तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. फुलेनगर, गोंडेमहागाव या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निवड करण्यात आल्या. त्यामुळे चोवीस ग्रामपंचायतींच्या ७० प्रभागांच्या १७७ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कुठे भाजपने तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली,
मात्र, तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या व गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेल्या ईस्लापूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पॅनेलने पंधरापैकी बारा जागांवर विजय मिळविला. भाजपने माजी मंत्री डी. बी. पाटील, आमदार भीमराव केराम यांच्या नावाचा वापर करून निवडणूक लढविली तर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार हेमंत पाटील, पालकमंत्री अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नावाचा वापर करून निवडणूक लढविली होती.