एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:35 AM2024-10-18T10:35:22+5:302024-10-18T10:36:00+5:30

एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Due to MIM, the tension of Congress has increased in Nanded Lok Sabha by-election  | एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 

एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 

 
नांदेड : नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना गुरुवारी  उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही तासांतच ‘एमआयएम’नेदेखील ही पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात साेेडून भाजपचे कमळ हाती धरले. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले होते; परंतु काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने अनुभवी चेहरा पुढे करत त्यांना ताकद देण्याचे काम केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. त्यामुळे मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली होती; मात्र दुर्दैवाने खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. तद्नंतर आता नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. 

काँग्रेसने गुरुवारी सकाळी दिवंगत वसंतराव यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उभे राहणार असल्याची घोषणा केली. 

भाजपने मात्र, अद्याप ही पोटनिवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. असे असले तरी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी खासदार प्रतापराव चिखलीकर या दोघांची नावे चर्चेत आहेत.  

२०१९ मध्ये मतविभाजन ठरले होते निर्णायक
मोदी लाटेत २०१४ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करणाऱ्या अशोक चव्हाण यांना २०१९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांना ४ लाख ८६ हजार ८०६ मते मिळाली होती. तर चव्हाणांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली होती.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मते घेतली होती. या ठिकाणी झालेल्या सेक्युलर मतांच्या विभाजनामुळे अशोक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

वंचित आणि जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार का?
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास लाखांचा पल्लादेखील पार करता आला नव्हता. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जरांगे फॅक्टरमुळे काँग्रेसला यश मिळविणे सोपे झाले होते. 
- मात्र, आता पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारीने काँग्रेसने टेन्शन वाढले असून वंचित आघाडी काय भूमिका घेणार? तसेच, जरांगे फॅक्टरही आता किती निर्णायक ठरेल याचीही उत्सुकता आहे. 
 

Web Title: Due to MIM, the tension of Congress has increased in Nanded Lok Sabha by-election 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.