नांदेड : जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याच्या टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असताना दुसरीकडे जनावरांसाठी लागणारा सुका चाराही महागला आहे. दहा रुपयाला मिळणाऱ्या कडब्याच्या पेंडीचा भाव २० रुपयावर गेल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.
जिल्ह्यात यंदा ज्वारीची लागवड बऱ्यापैकी असली तरी कडब्याचा सुका चारा मात्र कमी होणार आहे. हिरवा चारा घेण्याचा खर्च परवडत नसल्याने जनावरे विक्रीसाठी बाजाराकडे नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दुभत्या जनावरांना सांभाळणे पशुपालकांसाठी अत्यंत कठीण होत आहे. उत्पादन खर्च आणि होणारे उत्पादन याचा मेळ बसत नसल्याकारणाने पशुपालक आता जनावरे बाजाराकडे घेऊन जात आहेत. भाकड जनावरे सांभाळणे तर दुभत्या जनावरांपेक्षाही अवघड आहे. होणारा खर्चाचा विचार करता ही जनावरे बाजारात नेऊन विकलेली बरी असा विचार आता पशुपालक करत आहे.
जिल्ह्यातील हल्ली बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुग्ध व्यावसायिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चारा महागल्यामुळे दुभती जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. भाकड जनावरांची तर थेट विक्री करण्यात येत असल्याचे सध्या बैल बाजारात हे चित्र पाहावयास मिळत आहे. कडबा बाजारात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पशुपालक फिरून कुठे स्वस्त चारा मिळतो का, याची देखील पाहणी करत आहेत.
अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच चारा पिकांची लागवड खूप कमी प्रमाणात झाली असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. हिरव्या चाऱ्याची एक पेंडी २५ ते ३० रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागतो. या जनावरांकडून मिळणारे दूध आणि होणारा खर्च याचा मेळदेखील बसत नाही. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशुपालक अत्यंत अडचणीत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यास हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार आहे.
वैरणीसाठी मोजावे लागतात अधिकचे पैसेसध्या उस तोडणी बाकी असल्याने अणखी आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांना चारा मिळेल. तसेच ज्या भागात पाण्याची व्यवस्था आहे, तेथील स्थिती बरी आहे. पण कोरडवाहू तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे अधिक जनावरे आहेत, त्यांच्याकडे जर चाऱ्याची सोय नसेल, तर अशा शेतकऱ्यांसमोर आता वैरण गोळा करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागण्याची वेळ येणार आहे.
जनावरांची उपासमारसध्या उसाची तोडणी सुरू असल्याने हिरवा चारा आहे. पण काही दिवसांत तुटवडा जाणवेल. त्यासाठी सुका चारा घेणे आवश्यक आहे. मात्र, कडब्याचे भाव २० रुपये पेंडीवर पोहोचल्याने कडबा घेणे अतिशय खर्चिक आहे.-विश्वनाथ वाघ, शेतकरी पशुपालक पाथरड (रेल्वे)