नांदेड : तिसरे महायुद्ध रोखावयाचे असेल तर जलसाक्षरता आवश्यक आहे. दिवसेंदिवस शिक्षण आणि ज्ञानामधील दरी वाढत आहे. पण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे शिक्षणाबरोबरच ज्ञानही देत आहे. विद्यापीठाने हाती घेतलेले जलपुनर्भरणाचे काम अकालमृत्यू रोखणारे आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ‘तिसऱ्या महायुद्धाचे समाधान: जलसाक्षरता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले तर यशदा पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, ऊर्ध्व पैनगंगेचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत, जलनायक डॉ. प्रमोद देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, डॉ. अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ़ राणा म्हणाले, कधीकाळी भारतात महाराष्ट्र हे विकासाबाबतीत नंबर एकचे राज्य होते. पण आज दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येत आपण एक नंबरवर गेलो आहोत़ विद्यापीठ हे समाजासाठी एक आदर्श असते. विद्यापीठामधूनच समाजातील तळागाळापर्यंत विविध प्रोत्साहित बाबी पोहोचत असतात. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकाराने जलसाक्षरतेद्वारे जलपुनर्भरणाचे जे कार्य झालेले आहे ते कौतुकास्पद आहे़ मराठवाडा हा विभाग बऱ्याच प्रमाणात दुष्काळप्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे पावसाच्या पाण्याची कमतरता नाही पण त्याचे नियोजन, पुनर्भरण, साक्षरता याची कमतरता आहे. येथे पडलेल्या पावसाच्या सरासरी प्रमाणामध्ये आमच्या भागात २५ टक्केच पाऊस पडतो. पण आम्ही समाजाला जलसाक्षर करून दुष्काळावर मात केली आहे. आज विद्यापीठामध्ये जे काही जलसाक्षरतेवर कार्य होत आहे. ते येथे आलेल्या चारही जिल्ह्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपआपल्या महाविद्यालयात, गावात, घरी याबद्दल माहिती द्यावी आणि जलसाक्षरतेचे काम हाती घ्यावे, असे आवाहन डॉ़ राणा यांनी केले़ दरम्यान, यशदा पुणेचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे, जलनायक डॉ. प्रमोद देशमुख यांनीही आपले विचार मांडले.
लवकरच जलसाक्षरतेवर अभ्यासक्रम - कुलगुरू जलसाक्षरतेवर लवकरच अभ्यासक्रम तयार करण्यात येईल आणि तो अभ्यासक्रम व्यवस्थापन विषयांमध्ये समावेश करण्यात येईल, असे मत कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले़ त्याशिवाय येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ परिसर, लातूर आणि परभणी उपकेंद्र आणि न्यू मॉडल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. या जलसाक्षरतेमुळे मराठवाडा विभागाचा आर्थिक व सामाजिक कायापालट होईल, असा विश्वास डॉ़ उद्धव भोसले यांनी व्यक्त केला़