रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना शंभर दिवस हमखास काम दिले जाते. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक कामे सुरू असायची. तसेच मजुरांची संख्याही ५० हजारांहून अधिक होती. मात्र मागील दोन वर्षांपासून योजनेअंतर्गत मजुरांची संख्या घटली असून, कामांची संख्याही कमी झाली आहे. या योजनेअंतर्गत २३८ रुपयांची मजुरी दिली जाते. त्या तुलनेत खासगी बांधकामावर मजुरांना कमीतकमी ५०० रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मजूर शहराकडे धाव घेत असून, त्या ठिकाणी मिळणाऱ्या मजुरीवर समाधान मानत आहेत.
काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दोन, अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने होत असलेली उपासमार, अशा कठीण प्रसंगातून मजुरांना जावे लागत होते. दरम्यान, एप्रिल महिन्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर ९ हजार ३०२ मजूर उपस्थित होते. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटला होता. मात्र ग्रामपंचायत यंत्रणेकडून यंदा कामे होत नसल्यामुळे शेकडो मजुरांच्या हाताला कामच मिळाले नाही. एरव्ही उन्हाळ्यात मग्रारोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जाते. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर बाहेर जाऊ नयेत यासाठी रोहयोची कामे सुरू होतात.
चौकट -
अनेक गावांत मजुरांना काम मिळत नाही. तर काही ठिकाणी केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे यंदा सुरू असलेल्या कामावर मजुरांची संख्या कमी होती. सर्वाधिक कामे किनवट, माहूर, उमरी या तालुक्यांत केली जात आहेत.
सरपंच काय म्हणतात
१. या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामपंचायतीकडून कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. पुढील वर्षी ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणावर कामे केली जातील.
- चंदेल, सरपंच, पिं. महिपाल
२. कोरोनामुळे ग्रामपंचायतींना कामांचा प्रस्ताव सादर करता आला नाही. त्यामुळे रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करता आली नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे माणसे घराबाहेर पडत नव्हती.
हाताला काम नाही अन् रोहयो नाही
१. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरातून गावाकडे परत आलो. मात्र गावात काम मिळत नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न आहे.
- बबन कांबळे, आंबाळा.
२. दरवर्षी आम्हाला उन्हाळी कामामुळे मोठा आधार मिळायचा. शेतातली सुगीचे कामे संपली की रोहयोच्या कामावर आम्ही जात होतो. मात्र आता दोन वर्षे झाली काम बंद असल्याने आमच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शांताबाई वाघमारे, कवलगाव.