जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. या कार्यालयाने पाणीटंचाईच्या कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया हाती घेतली. परंतु, या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया हाताळताच येत नसल्याने पंचायत झाली. यावर तोडगा म्हणून संगणकाचे ज्ञान असलेला व निविदा प्रक्रिया हाताळू शकेल अशा खासगी इसमाला यासाठी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार मुख्तार नावाच्या एका खासगी इसमावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
या इसमाने ई-निविदा प्रक्रियेत अक्षरश: धुडगूस घातल्याची ओरड होत आहे. या कामासाठी अनेक ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. पण, त्याने मनमानी पद्धतीने अनेक निविदा अपात्र ठरविल्या असून, त्याला वाट्टेल तेव्हा रात्री-बेरात्री तो निविदा उघडत असतो, असा आरोप आहे. या इसमाच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावाने व अन्य काही नातेवाइकांच्या नावाने रजिस्ट्रेशन असल्याने त्यांना फायदा पोहचविण्याचा प्रयत्न तो करत असल्याचा आरोप आहे.
या विभागात मागील बऱ्याच वर्षांपासून कामे करणाऱ्या कंत्राटदारांना अपात्र ठरवून या खासगी इसमाने नवीन कंत्राटदारांच्या निविदा मान्य केल्या आहेत. प्रत्यक्षात मागच्या वर्षी टंचाईच्या कामाच्या निविदांना उशिराने कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. यापैकी बरीच कामे शेतातून करावयाची असल्याने करता आलेली नाहीत. या बाबीचा गैरफायदा या खासगी इसमाकडून घेतला जात आहे, असा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.