कासराळीत १३ जागा आणि १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. येथे लक्ष्मण ठक्करवाड व परिवर्तन पॅनल समोरासमोर आहेत. प्रचार येथे शिगेला पोहोचलाय. नेहमीप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहावी यासाठी प्रयत्नशील ठक्करवाड गट तर सतत आलेल्या अपयशाने एकदा संधीची मागणी करत मतदारांशी भावनिक साद घालणारा युवकनिर्मित परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल मतदारांसमोर जात आहेत. नेहमी येथे सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांकडून कार्यकाळातील अपयश, प्रताप लपवण्यासाठी प्रलोभने, आमिषे दाखविली जात आहेत. खानावळी, चिकन, मटनाच्या पंगती उठत आहेत. सोबतीला झिंग येण्यासाठी दारूचा वापर आहेच. विरोधी गटांकडून प्रचारात दिसणारा व्यक्ती दुसऱ्यांदा त्या गटात दिसत नाही. त्याची मनधरणी केली जाते. त्याची खुशामत येथे होते असे पहिल्यांदाच घडत आहे. मतदानाला अजून तीन दिवसांचा अवधी आहे. विनाकारण कोणासोबत का पंगा घ्यावा ही येथील बहुतांश लोकांची मानसिकता असल्याने ते तटस्थ भूमिकेत आहेत; मात्र चंगळवादी मानसिकतेत असलेल्या मंडळींकडून आम्ही खाऊ, पिऊ मिळेल ते घेऊ; पण मतदान तुम्हालाच करू, असा सूर निघत आहे.
खाऊ, पिऊ दिलेले घेऊ; मात्र मत तुम्हालाच देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:44 AM