मरखेल : कमी खर्च, कमी मशागत करून चांगले उत्पन्न मिळविण्याचा प्रयोग क्वचितच शेतकऱ्यांकडून केला जातो. असाच प्रयोग देगलूर तालुक्यातील लोणी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजी शिंदे यांनी केला आहे. कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे, हमखास उत्पन्न देणारे व लागवड खर्च कमी असलेले पेरूची लागवड करून एक वर्षातच त्यापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे.
पेरूच्या पिकाचा बहर आला असून एका वर्षात दोन सिझन घेतले जातात पहिल्या सिझनमध्ये १७.५ कि्वंटल पेरूचे उत्पन्न निघाले असून अजून ३० ते ३५ क्विं. उत्पन्न अपेक्षित आहे. पेरूविक्रीसाठी नांदेड, निझामाबाद, व हैद्राबाद ही जवळील बाजारपेठ असून या ठिकाणी पेरूला प्रतिकिलो ५० ते ७० रु. दर मिळत आहे. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला १० ते १५ किलो फळधारणा होते दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन प्रति झाडामागे ३० ते ३५ किलो फळधारणा होते. फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पांडुरंग फुंडकर व नानाजी देशमुख कृषी फळबाग योजनेतून हेक्टरी २ लाख रुपये अनुदान मिळते त्यासाठी शेतीत बोअर असणे व ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे. दरम्यान, चार एकरात २४०० पेरूच्या झाडाची लागवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात लावण्यात आलेल्या १००० झाडांना एक वर्षात फळधारणा झाली असून दोन्ही सिझनमध्ये सरासरी १० टन उत्पन्न निघण्याची शक्यता असून प्रतिकिलो ६० रुपयांचा भाव मिळाला तर एका वर्षात ६ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
अभ्यास करून पेरूची लागवड केली पारंपरिक शेतीतून दरवर्षी तोटा सहन करावा लागत होता. पाण्याची सोय असल्यामुळे सुरुवातीला टोमॅटो, वांगी यांचे पीक घेतले मेहनत जास्त व फायदा कमी होत होता. पेरू लागवड कमी खर्चात सर्व प्रकारच्या जमिनीवर कमी पाण्यावर करता येते हे समजल्यानंतर पेरू उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांना भेटून अभ्यास करून पेरूची लागवड केली आहे - शिवाजी शिंदे (प्रगितशील शेतकरी), लोणी ता.देगलूर