- प्रा.शरद वाघमारे (मालेगाव, नांदेड)
ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पिके घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे सध्याचे वास्तव चित्र. शासनाचे शेतीविषयक धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे पारंपरिक पिकांच्या लागवडीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पारंपरिक शेतीला फारकत देऊन मालेगाव शिवारापासून जवळच असलेल्या पळसगाव, ता. वसमत येथील विलासराव वामनराव डाखोरे यांनी दीड एकर शेतात नगदी पीक ओळखल्या जाणाऱ्या शोभिवंत फुलशेतीची प्रयोगशील पद्धतीने लागवड करून हजारोंचे उत्पन्न मिळविले आहे.
डाखोरे यांच्या शेतातील फुलांना सद्य:स्थितीत पुणे, अमरावती, अकोला, जालना आदी विविध जिल्ह्यांतून मागणी असते. भविष्यात अन्य जिल्ह्यांतही फुले जातील, असा विश्वास डाखोरे यांनी व्यक्त केला. डाखोरे यांच्या शेतातून दररोज जवळपास दोन क्ंिवटल फुले बाजारात विक्रीला जात असतात. त्यांनी शेतात फुलशेतीसाठी विशेष कूपनलिका घेतली. जुन्या प्रकारच्या फुलांची लागवड न करता त्यांना विविध लग्न समारंभ व कार्यक्रमासाठी जी शोभिवंत व सुवासिक फुलांची लागवड केली आहे. त्यामध्ये पिवळा, पांढरा, तांबडा, लाल अशा रंगांची फुले आहेत. त्यांच्या शेतातील शिर्डी गुलाबाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
‘डोलिया’ या शोभिवंत गुलाब व पुष्पगुच्छांसाठी लागणारे गवत (अॅस्पॅरग) याचीही प्रयोगशील पद्धतीने लागवड केली आहे. या फुलशेतीच्या लागवडीसाठी त्यांनी सेंद्रिय पद्धत व ठिबक सिंचनाची पद्धत अवलंबिली आहे. डाखोरे यांच्या फुलशेतीतून वर्षभर ही फुले विक्रीला जातात, हे विशेष!अकोला, जालना, अमरावती आदी जिल्ह्यांतही या फुलांना मोठी मागणी वाढली आहे. फुलशेतीतून डाखोरे यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. याशिवाय गावातील मजुरांनाही चांगला रोजगार फुले तोडण्यामुळे होत आहे.
डाखोरे यांच्या फुलशेतीला दसरा, दिवाळी आदी सणासुदीत चांगली मागणी असते. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके न घेता नगदी पिकांकडे वळावे, असे त्यांनी सांगितले. डाखोरे यांनी दीड एकर शेतीत डेकोरेशन फुलांची लागवड करून ती प्रयोगशील पद्धतीने फुलविली आहे़ त्यांनी फुलांची रोपे उन्हाळ्यात पुणे येथून आणली़ उन्हाळ्यात ही फुले स्वस्त दरात येतात असे त्यांनी सांगितले़ जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने फुलांची लागवड केली़ सप्टेंबरमध्ये फुलांची लागवण सुरू झाली़ या डेकोरेशन फुलात विविधता असल्याने बाजारात त्याला मोठी मागणी आहे़ असे सांगून आंतरपीक पद्धतीने ही फुले लावल्याचे ते म्हणाले़ परिणामी कमी जमिनीत जास्त लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला़ कीड नियंत्रणासाठी गरजेनुसार सेंद्रिय खताचा वापर केला़ ठिबकद्वारे औषधी फुलांना दिली, असेही त्यांनी सांगितले़