शासकीय धान्याची कृष्णूर येथील इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीत विल्हेवाट लावण्यात येत होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने या प्रकरणाचा भांडाफोड केला होता. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्यात कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया, वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार, ललित खुराणा यांच्यासह ट्रक चालकांचा समावेश होता. ट्रक चालकांना लगेच जामीन मिळाला; परंतु इतर आरोपी मात्र अनेक महिने तुरुंगातच होते. कोरोनाच्या लाटेचा या आरोपींना फायदा मिळून त्यांचा जामीन मंजूर झाला. त्यानंतर बाहेती यांनी पुन्हा कंपनीत उत्पादन सुरू केले होते; परंतु मनीलाँड्रिंगच्या आरोपावरून ईडीने बाहेती यांना उचलले. आता ईडीच्या कारवाईमुळे यातील काही जण भूमिगत झाल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणात फरार असलेले तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हे काही दिवसांपूर्वीच परभणी येथील भूसंपादन कार्यालयात रुजू झाले होते; परंतु ईडीच्या कारवाईची कुणकुण लागताच ते कार्यालयातून बेपत्ता झाले. ईडीच्या रडारवर आणखी कोण-कोण आहे हे लवकरच पुढे येणार आहे; परंतु या कारवाईमुळे अनेकांच्या छातीचे ठोके मात्र वाढले आहेत.
ईडीच्या एन्ट्रीने धान्य घोटाळ्यातील आरोपी भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:13 AM