नांदेड : मुतखड्यावरील प्रभावी आणि स्वस्त औषध संशोधनात येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला यश आले आहे. ‘डिसोकॅल’ नावाने उत्पादित या आयुर्वेदिक औषधाला राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने विक्री परवाना दिला असून केंद्र सरकारचे पेटंटही मिळाले आहे.विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. सी.एन. खोब्रागडे आणि डॉ. अमोल शिरफुले यांनी या संशोधनास १० वर्षापूर्वी सुरुवात केली होती. या आजारासाठी आयुर्वेदामध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट वनस्पतींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करुन हे औषध सिद्ध केले आहे. सध्या ते गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध होईल. या गोळ्यांमुळे मुतखडा पूर्ण बरा होतो शिवाय तो परत होत नाही, अशी माहिती कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी दिली.हैदराबादमधील राष्ट्रीय पोषण संस्थेत या औषधाच्या उंदरावर चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यातही औषधी घटक मुतखड्याचे विघटन व नंतर त्याचे उत्सर्जन वाढवते आणि मुतखड्याच्या पुनर्निर्माण प्रक्रियेस प्रतिबंध करीत असल्याचे आढळले. या यशस्वी प्रयोगानंतर नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रा. डॉ. आर.एच. अमीलकंठवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. त्यानंतर ‘डिसोकॅल’ या नावाने औषध तयार करण्यात आले, असेही डॉ. विद्यासागर यांनी सांगितले.इतर औषधांच्या तुलनेत स्वस्त देशभरात मुतखडा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ९ टक्के असणारे रुग्णांचे प्रमाण सध्या १५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. आम्ही विकसित केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या घेतल्यानंतर पुन्हा मुतखडा होत नाही. शिवाय उपलब्ध औषधांपेक्षा याची किंमत कितीतरी स्वस्त असेल.- डॉ. सी.एन. खोब्रागडे, मुख्य संशोधकराज्यात अनेक ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. हजारो खेडेगावांतील लोकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. बोअरच्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने मुतखडा होतो. सध्यस्थितीत राज्यात हजारो गावामंध्ये शेकडो मुतखड्याचे रुग्ण दिसतात. त्यांना या औषधामुळे दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, असलेला मुतखडा पडल्यानंतर तो परत उद्भवतो. या औषधामुळे त्याला प्रतिबंध होणार आहे.
मुतखड्यावर प्रभावी व स्वस्त आयुर्वेदिक औषधाची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:27 AM