गावात एकाेपा राहावा, अनावश्यक बाबीवरील खर्च कमी करून धार्मिक, सांस्कृतिक वातावरणात श्री गणेशाेत्सव साजरा व्हावा या अनुषंगाने एक गाव एक गणपती या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पाेलीस व प्रशासनाच्या आवाहनाला ५९७ गावातील ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आहे. काेराेना संकटात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. श्री प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी असल्याने काेराेना नियमावलीतच गणेशाेत्सव साजरा केला जात आहे. या कालावधीत प्रशासनाने लसीकरण माेहीम राबविण्याचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे. या उपक्रमाला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी मंडळांना प्रयत्न करावे लागत आहेत.
आजघडीला जिल्ह्यात ११ लाख ४८ हजार १४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या लसीचा साठा उपलब्ध असून श्री गणेश मंडळांच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नांदेड महापालिकेअंतर्गत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्या-त्या भागातील गणेश मंडळांशी संपर्क साधून लसीकरण शिबिराचे आयाेजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दाेन्हीही लस उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा आराेग्य विभाग, महापालिका, नगरपालिका यांना समन्वय साधून शिबिरांच्या आयाेजनाबाबत जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी सूचना दिल्या आहेत.