नांदेड: राष्ट्रवादी कॉँग्रेसबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित होता, जे उद्धव ठाकरे यांच्याबाबत झाले तोच निकाल लागला, निवडणूक विभागाचा हा अजब न्याय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. त्यांनी आज सकाळी नांदेड येथे प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निर्णयानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.आज सकाळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आलेल्या निर्णयानंतर हा निर्णय अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक विभागाचा हा अजब न्याय असल्याचे देखील ते म्हणाले.
निष्ठेमध्ये फरक नाही पडणार तसेच आता जनतेच्या न्यायालयातच हा विषय मार्गी लागेल, लोकच ठरवतील. पक्षाचे निवडणूक चिन्ह बदलले तरी काही फरक पडत नाही. जनता हुशार झाली आहे. निष्ठेमध्ये काही फरक पडत नाही, असा विश्वास देखील चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
निर्णय देताना निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं?
- अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवारांना परवानगी
- शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता
- महाराष्ट्रातले ४१ आणि नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
- महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
- राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हा आणि पक्षाचं नाव सुचवावं.
- ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
- राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत.