नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या विद्यापीठ परिसर विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठीची निवडणूक ४ जानेवारी रोजी सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागात लोकशाही पद्धतीने निवड पार पडली़ या निवडणुकीमध्ये जैवतंत्रशास्त्र संकुलाचा विद्यार्थी शिवदास कदम यांची सचिवपदी निवड झाली.
या निवडणुकीसाठी विद्यापीठ परिसरातील विविध संकुल, विद्यापीठ उपकेंद्र, लातूर आणि न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील एकूण ६२ वर्ग प्रतिनिधींपैकी ४१ वर्गप्रतिनिधी उपस्थित होते. यामधून सचिवपदासाठी प्रभावती बिरादार, गजानन इंगोले आणि शिवदास कदम या वर्ग प्रतिनिधींनी नामनिर्देशन अर्ज भरून निवडणूक लढविली. यामध्ये रसायनशास्त्र संकुलाची विद्यार्थींनी प्रभावती बिरादार यांना २, सामाजिकशास्त्र संकुलाचा विद्यार्थी गजानन इंगोले यांना १४ आणि जैवतंत्रशास्त्र संकुलाचा विद्यार्थी शिवदास कदम यांना २३ मते पडले़ यावेळी दोन मते बाद झाली़
शिवदास कदम यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यांना विद्यापीठ परिसर विद्यार्थी परिषदेचा सचिव म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सचिव आणि वर्ग प्रतिनिधींचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी अभिनंदन करून उपस्थित वर्ग प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. सदरील निवडणुकीची प्रक्रिया प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा संचालक डॉ.मनोज रेड्डी, प्रभारी विधी अधिकारी तथा उपकुलसचिव डॉ.श्रीकांत अंधारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रामदास पेद्येवाड, विद्यापीठ परिसर प्रभारी प्राध्यापक डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. वैजनाथ अमुलवाड, डॉ. अर्चना साबळे यांच्या उपस्थितीत पार पडली.यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभाग आणि सुरक्षा विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.