लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद (जि. नांदेड) : तेलंगणातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बासर मंडळातील पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवर धर्माबादकडे येणाऱ्या वाहनांची चौकशी सुरू केली असून, दमदाटी केली जात आहे. प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्याविरोधात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
धर्माबाद शहरापासून तेलंगणा सीमा ३ किमीवर आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, धर्माबादकडून तेलंगणाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे, पण सीमेवर उलटच होत आहे. धर्माबाद ही मोठी बाजारपेठ आहे. अनेक व्यापारी तेलंगणात व्यवसाय करून रोकड घेऊन धर्माबादला येतात. ही गोष्ट हेरून बासर पोलिसांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
नांदेडच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तेलंगणा पोलिसांची तक्रार केली आहे. माझ्याशी पोलिस उद्धट बोलले. तेलंगणातील पोलिस सीमेवर थांबून विनाकारण त्रास देत आहेत. - डी. आर. आण्णा कंदकुर्तीकर, बांधकाम व्यावसायिक