धर्माबाद ( नांदेड ) : तालूक्यातील बाचेगाव येथे वीजचोरी शोधमोहिमेसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर गावातील 40 ते 50 लोकांच्या जमावाने हल्ला करत महावितरणच्या कर्मचारी व अधिका-यास जबर मारहाण केली. यात महिला कर्मचा-याचाही समावेश आहे.
देगलूर विभागांतर्गत वीजचोरी विरोधात सुरु असलेल्या मोहिमेत बुधवारी धर्माबाद तालूक्यातील करखेली, रावधानोरा, धानोरावाडी तसेच बाचेगाव या गावामध्ये आकडेटाकून चोरुन वीज वापरणा-या नागरिकांवर कारवाई करत असतांना बाचेगाव येथे वीज चोरुन वापरणा-या कुटूंबातील 40 ते 50 लोकांनी महावितरणच्या पथकामधील महिला कर्मचा-यासह अधिकारी व कर्मचा-यांना आकडे का काढता म्हणत शिवीगाळ करत जबर मारहाण केली आहे. करखेली शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता सुमित पांडे, सहाय्यक अभियंता शवरेटवार, तसेच एच.एस.मानधरणे, बी.टी.कुकडे, श्रीमती पी.एस.जाधव तसेच पंच म्हणुन आलेल्या इतर दोन व्यक्तीनांही मारहाण करण्यात आली.
या मोहिमेत 25 वीज चो-या पकडण्यात आल्या असून बाचेगाव येथील मारहाण करणा-यांच्या विरोधात धर्माबाद पोलीस स्टेशन मध्ये 9 वीज चोरांविरोधात कलम 353, 323 व 332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बाचेगावातील गंगाधर कोडमंगल, हुसेन उरुगुलवाड, जनाबाई आनंदा खंदारे, भिमराव दिगंबर खंदारे, तुळशीराम खंदारे, लक्ष्मण संबटवाड, गणेश रायपतवार, नामदेव खंदारे, काशीनाथ सबनवार आदी वीजचोरांचा समावेश आहे.