माहे मार्च २०२१ च्या उद्दिष्टानुसार वीज देयक वसुलीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. त्यामुळे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व मार्चअखेरीस केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्व जनमित्रांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज बिल वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या निर्बंधांमुळे वीज ग्राहकांना वीज भरणा केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य होत नसल्यामुळे जनमित्रांनी थकबाकीदार ग्राहकांच्या घरी जाऊन विजबिल वसुलीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वीजबिल वसुलीसाठी जात असताना सर्व कर्मचाऱ्यांनी आपले कंपनीचे ओळखपत्र सोबत बाळगावे, त्याचबरोबर कोविड-१९ च्या संदर्भातील जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सूचना पाळून आवश्यक ती काळजी घेत ग्राहक व स्वतःमध्ये योग्य ते अंतर राखून वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश महावितरणने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वीजग्राहकांना अखंडित वीजसेवा देण्यासाठी महावितरणचे कोरोना योध्दा जिवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी योग्य ती खबरदारी घेत वीजबिल भरून सहकार्य करावे. ज्या वीजग्राहकांना ऑनलाईन सुविधांचा वापर करणे शक्य आहे, अशा सर्व ग्राहकांनी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा घरबसल्या वापर करत वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.