लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मीटर रीडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे़ नांदेड परिमंडळातील ५ लाख ५७ हजार ६५६ वीजग्राहकांनी मोबाईल नोंदणी केली असून उर्वरित ग्राहकांनी सुविधेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे.नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच कृषीपंप व इतर वीजग्राहक असे एकूण १० लाख २५ हजार ७२७ वीजग्राहक असून त्यापैकी ५ लाख ५७ हजार ६५६ वीजग्राहकांनी मोबाईल नोंदणी केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १७ हजार १३७ ग्राहक, परभणी - १ लाख २८ हजार १०५ तर हिंगोली जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ९४६ वीजग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांना रिडींग, रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, एकूण युनिट व वापरलेले युनिट याचा तपशील असणारा एसएमएसद्वारे येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १९१२ आहे.बिल भरण्यासाठी प्रिंटेड बिलाची वाट न पाहता आपल्याला आलेला एसएमएस बिल भरणा केंद्रावर दाखवूनही वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल नोंदणीचे अनेक फायदे असल्याचे महावितरणने कळविले आहे़मराठीत एसएमएस मिळवण्यासाठीएसएमएसद्वारे मराठी भाषेतून माहिती मिळविण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून इंग्रजीमध्ये कॅपीटल अक्षरामध्ये एमएलऐएनजी नंतर स्पेस देवून ग्राहक क्रमांक टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.
असा नोंदवा मोबाईल क्रमांकनोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून इंग्रजी भाषेमध्ये ‘एमआरईजी टाईप करून स्पेस देवून बारा अंकी ग्राहक क्रमांक’ टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस करावा. तसेच महावितरणच्या संकेत स्थळ, मोबाईल अॅपव्दारे नोंदणी करू शकता.याशिवाय चोवीस तास उपलब्ध १९१२ तसेच १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येईल.