नांदेड: येथील रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे काचेचे दरवाजे अज्ञात व्यक्तीने तोडल्याने दोन दिवसांपासून लिफ्ट बंद आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना अडचण होत आहे. विशेषतः वृद्ध प्रवाशांना सामानासह जाणे त्रासदायक ठरत आहे.
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर प्रवाशांच्या सुविधेसाठी लिफ्ट बसविली आहे. २८ नोव्हेबर रोजी या लीफ्टचे दरवाजे अज्ञात व्यक्तीने तोडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे सध्या लिफ्ट बंद आहे. दरम्यान लिफ्टला दरवाजे बसविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. लवकरच लिफ्टची सेवा पूर्ववत केली जाईल, असे रेल्वेने सांगीतले. लिफ्टचे दरवाजे तोडण्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे.
एक्सलेटरही पडले होते बंद २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने रेल्वे स्थानकावरील एक्सलेटर देखील बंद पडले होते. एक्सलेटरच्या खड्यात पाणी साचल्याने एक्सलेटरच्या सेन्सरमध्ये बिघाड झाला होता. रेल्वे प्रशासनाने तातडीने हे काम करुन एक्सलेटर दुरुस्त केले. सध्या फ्लॅटफॉर्म ४ वरील एक्सलेटर सुरु करण्यात आले आहे.