याप्रकरणी गणेशसिंह हनुमानसिंह ठाकूर यांनी नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ठाकूर यांच्या तक्रारीनुसार शहरातील गाडीपुरा भागात असलेल्या श्री क्षेत्रीय समाज रेणुकामाता मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांच्या फायद्यासाठी ४७ लाख ९ हजार ५७५ रुपयांचा अपहार केला आहे. दरम्यान, न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) प्रमाणे इतवारा पोलिसांना संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून इतवारा पोलिसांनी बिरजूसिंह भिक्कमसिंह गहेरवार (५५), बद्रीसिंह दगडूसिंह कात्री (५५), ॲड.जोधासिंह शंकरसिंह गहिलोत (६४) आणि भीमसिंह हनुमानसिंह कौशिक (५८) या चार जणांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील चारही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु फेब्रुवारी २०२१ मध्ये जिल्हा न्यायालयाने तो फेटाळून लावला. सदर प्रकार २०२० मध्ये घडला होता. या गुन्ह्यातील आरोपी विश्वस्त बिरजूसिंह भिक्कमसिंह गहेरवार, बद्रीसिंह दगडूसिंह कात्री आणि भीमसिंह हनुमानसिंह कौशिक यांना पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार कलंदर, मांडवकर, पवार, हंबर्डे आणि जिनेवाड यांनी अटक केलेल्या तीन विश्वस्तांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलिसांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रवीण कुलकर्णी यांनी या तिघांना तीन दिवसांची २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी वकील विश्वस्त पोलिसांच्या हाती लागले नाहीत.