नांदेड : नांदेड-अर्धापूर या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून यामुळे किरकोळ अपघातामध्ये वाढ होत आहे. परंतु याकडे मात्र संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
नांदेड -अर्धापूर हा राज्य महामार्ग असून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आलेले आहे. या रस्त्यावर अँाटो, बस, दुचाकी यासह मोठय़ा प्रमाणात जड वाहने धावतात. यामुळे रस्त्याची नियमित डागडुजी करणे आवश्यक आहे, परंतु तसे केले जात नाही.
या महामार्गावर आसना नदीपासून अर्धापूर येथील बसस्थानकापर्यंत शेकडो खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले असून खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यावर्षी म्हणावा तेवढा पावसाळा झाला नसताना रस्त्याची ही अवस्था झाली असल्याने वाहनधारकांतून संपात व्यक्त केला जात आहे.
रस्त्यावर गुडघ्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत, परंतु ते बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसेच संबंधित गुत्तेदाराकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. याचा परिणाम वाहनधारक त्रस्त झाले आहेत. संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)