देगलूर तालुक्यातील हाणेगाव ग्रामपंचायत सहा प्रभागांची तब्बल १७ सदस्यांची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सरपंच पद ना.मा. प्र. (ओबीसी महिलेसाठी )आरक्षित असून यामध्ये ॲड. प्रीतम देशमुख गट व शंकर राठोड गट अशी लढत झाली होती. यामध्ये शंकर राठोड गटाचे १२ सदस्य निवडून आले. तर ॲड. प्रीतम देशमुख गटाचे पाच सदस्य निवडून आले. मात्र, शंकर राठोड गटात नामाप्र महिला सदस्य चार असून सरपंच पदाचे दावेदार कोण....? असा संभ्रम निवडीनंतर निर्माण झाला होता. मात्र, हा संभ्रम मिटविण्याकरिता हिरेमठ संस्थानचे शंकर लिंग शिवाचार्य महाराज, राष्ट्रवादीचे राजेश पंदरगे, भाजपाचे रमेश राणे यांनी मध्यस्थी करत वैशाली पडकंठवार यांना अडीच वर्षे तर शारदादेवी शंकर राठोड यांना अडीच वर्षे असे सरपंचपद ठरले. यानंतर १० रोजी गोपनीय पद्धतीने मतदान घेऊन सरपंच निवडणूक पार पडली. यात वैशाली पडकंठवार यांना १२ मते मिळाली तर ॲड. प्रीतम देशमुख गटाचे उमेदवार सावित्रीबाई पवार यांना ५ मते मिळाली. यात वैशाली पडकंठवार यांना सरपंच पदी घोषित करण्यात आले . तर उपसरपंचपदी मुजीब चमकुडे यांचे निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस. एस. ईडोळे व ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. उमाटे यांनी काम पाहिले. ही निवड प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे मरखेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, बीट जमादार मोहन कणकवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अखेर निवडीचा तिढा सुटला. ग्रामपंचायत हाणेगाव सरपंच पदाची निवड शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:16 AM