गोविंद टेकाळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : - हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका चोवीस वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. 'एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे. माझे हे बलीदान वाया जावु नये असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या जवळ आढळून आली आहे. शुभम सदाशिव पवार असे मयत तरुणाचे नाव आहे.
हदगाव तालुक्यातील वडगाव येथील मूळ रहिवासी असलेला २४ वर्षीय शुभम सदाशिव पवार प्लंबरचे काम करतो. तसेच काम करत करत शिक्षण ही घेतो. शनिवारी सकाळी रेल्वेने मुबंई येथुन नांदेड येथे आला. शुभम याने त्याच्या वडीलांना फोन द्वारे माहीती दिली की, मी नांदेडच्या नमस्कार चौक परीसरात बहीनीकडे जावुन फ्रेश होऊन गावाकडे येतो असे म्हणाला होता. परंतु 'शुभम' हा रात्री सात वाजेपर्यत घरी आला नाही, फोन लावले असता फोन उचलत नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. शुभम हा सकाळ पासुन घरी आलाच नाही. असे तामसा पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी शुभम यांचे मोबाईलचे लोकेशन चेक केले असता अर्धापुर परीसरात मोबाईल लोकेशन आहे असे सांगितले. शोध घेतला असता शुभम हा अर्धापूर येथील तामसा रोड वरील नरहरी मंगल कार्यालयच्या बाजुला झाडीमध्ये आढळून आला. त्याच्या जवळ विषारी औषधाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळली. ज्या चिठ्ठीमध्ये 'एक मराठा लाख मराठा' , मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे, माझे हे बलीदान वाया जावु नये मी शुभम सदाशिव पवार असा मजकुर आढळून आला.
घटनास्थळी अर्धापुर पोलीसांनी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी केशव पवार यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मस्के हे करत आहेत.