जिल्ह्यात एमजीएम महाविद्यालय, श्री गुरुगोविंदसिंघ आभियांत्रिकी महाविद्यालय, ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय व मातोश्री प्रतिष्ठान हे चार खासगी महाविद्यालये आहेत. साधारणपणे अडीच हजार विद्यार्थी क्षमता असलेल्या या महाविद्यालयातील प्राध्यापकांची संख्याही साडेपाचशेच्या जवळ आहे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीनशे आहे. कोरोना काळात सुरुवातीला दोन महिन्यांचे वेतन थकीत झाल्यानंतर पुढे काही महाविद्यालयांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन ५० टक्के अदा केले, तर काही महाविद्यालयांनी वेळेवर १०० टक्के वेतन अदा केल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे सध्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून काही महाविद्यालये परिस्थिती चांगली असतानाही कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावत असल्याचे सांगण्यात आले.
चौकट- मागील दहा महिन्यांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सुरुवातीला काही महिने ५० टक्केच वेतन मिळाल्यामुळे काटकसर करावी लागली. त्यातच बँकांचे हप्ते, मुलांचे शिक्षण शुल्क, घरभाडे असा खर्च करावा लागत असल्याने जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविद्यालयांकडून आर्थिक अडचणींचा देखावा-
कोरोनामुळे सुरुवातीचे दोन महिने प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात आले. त्यानंतर ५० टक्के पगार दिला जात आहे. काही महाविद्यालयांची परिस्थिती चांगली असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर आणि कमी करून दिले जात आहे. त्यामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. महाविद्यालये आर्थिक अडचणीचा देखावा निर्माण करत आहेत.
- यु. के. आठवले, जिल्हाध्यक्ष, भारतीय कामगार सेना, नांदेड.