अर्धापूर/हदगाव (नांदेड ): मामा भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अर्धापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भाच्याने मामाची हत्या केली. ही घटना तालुक्यातील चाभरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी (भाचा) एकनाथ जाधवला मनाठा पोलिसांनी अटक केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे दि.९ सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री बालाजी दिगंबर काकडे वय ४५ हे आपल्या घरी नेहमीप्रमाणे घरासमोरील वसरीत झोपले असता रात्री साडे अकराच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्याचे सपोनी विनोद चव्हाण, तुळशीराम चिट्टेबाग, मधुकर पवार, रावसाहेब देशमुख, कृष्णा यादव यांनी गुप्त खबरीमार्फत मिळालेल्या माहितीवरून व संशयावरून १९ वर्षीय एकनाथ बंडू जाधव याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याच्या माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
लग्नास मुलगी दिली नाही म्हणून केली हत्या
रोजगारासाठी रोडगी येथील बालाजी काकडे हे गत पन्नास वर्षांपूर्वी चाभरा येथे स्थायिक झाले. त्यांना या ठिकाणी चांगला रोजगार मिळत होता सर्व काही चांगले होते. त्यांची बहीण वनिताबाई बंडू जाधव हे मुळगाव सांडस ता.कळमनुरी येथील असून त्यांना तेथे रोजगार मिळत नसल्याने तेही चाभरा येथे कामानिमित्त आले व पंधरा ते वीस वर्षाखाली स्थायिक झाले. दोन्ही कुटुंबे रोज मजुरी करून आपला उदारनिर्वाह चालवत असे. बालाजी काकडे यांना दोन मुली असून त्यांचा भाचा एकनाथ जाधव यांने मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ कुठलेही काम करत नसल्यामुळे मामांनी नकार दिला. मामाने मुलगी देण्याचा नकार दिल्याचा राग मनात ठेवत संतापलेल्या भाचा एकनाथने मामाची हत्या केला होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले व घटनेनंतर तीन दिवसांतच आरोपीस मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.