नांदेड : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. या तालुकास्तरीय समितीत एकूण नऊ सदस्य राहणार असून, तहसीलदार समितीचे अध्यक्ष राहतील.
जिल्ह्यात हिमायतनगर व कंधार तालुक्यात स्वाईन फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या ठिकाणी प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रचार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. तालुकास्तरीय समितीत तहसीलदार हे अध्यक्ष असून, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील. पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सा. बां. वि.चे उपअभियंता, पशुधन विकास अधिकारी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर तसेच तालुका निरीक्षक, उपअधीक्षक भूमी अभिलेख हेही या समितीत सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. या समितीकडे तालुक्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. ब्लीचिंग पावडर, चुना पावडरचा पुरवठा करणे, मृत पक्ष्यांचे पंचनामे करणे, पोल्ट्रीफॉर्मचे निर्जंतुकीकरण करणे, मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावणे, जनजागृती करणे, आदी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.