नांदेड - येथील लॉयन्स परिवारामध्ये एकदाच तीन नवीन क्लबची स्थापना लॉयन्स क्लब सेंट्रलने केली असून, नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच १०२ नवीन सदस्यांची नोंदणी झाल्याची माहिती अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल यांनी दिली. लॉयन्स क्लब, नांदेड अन्नपूर्णा, लॉयन्स क्लब नांदेड प्रोफेशनल, लॉयन्स क्लब हिंगोली या तीन नवीन क्लबची स्थापना झाली. यासाठी झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया, लॉ. योगेश जायस्वाल, लॉ. संजय अग्रवाल, जी. एल. टी. कॉर्डिनेटर लॉ. गौरव भारतीया, लॉ. दिलीप ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर नांदेड सेंट्रलने स्वत:च्या क्लबमध्ये ३३ नवीन सदस्यांची नोंद केली. यासाठी त्यांना मल्टीपलच्या ३०२ क्लबमध्ये सातवा क्रमांक मिळाला. गतवर्षात लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलने गरिबांना मोफत जेवणाचे डब्बे, ब्लँकेट वाटप, सॅनिटायझर, मास्क वाटप आदी उपक्रम राबविले होते.
विद्यापीठाचे क्रिकेट मैदान अद्ययावत करण्यासाठी समिती
नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील क्रिकेट मैदान आधुनिक पद्धतीने अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली.
या समितीमध्ये यशवंत महाविद्यालयाचे डॉ. मनोज पैंजणे, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूरचे डॉ. महेश बेंबडे, प्रभारी कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, स्टेडियमचे व्यवस्थापक रमेश चौरे, क्रिकेटतज्ज्ञ भरत चव्हाण यांचा समावेश आहे. या समितीची बैठक १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता क्रीडा विभाग स्वारातीम विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी दिली.