नांदेड : शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारीवर लोहा इथून निवडून आलेले श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे़ याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली़
लोहा मतदारसंघातील उमेदवारीवरून श्यामसुंदर शिंदे आणि खासदार चिखलीकर यांच्यात सुरुवातीच्या काळात कुरबुरी झाल्या होत्या. हा मतदार संघ सेनेला सुटल्यामुळे चिखलीकरांचीही अडचण झाली होती़ चिखलीकरांचे मेव्हणे असलेल्या शिंदे कुटुंबियांनी चिखलीकरांच्या विरोधात उघडपणे पवित्रा घेत, अपक्ष लढविण्याची तयारी सुरु केली होती़ परंतु ऐनवेळी शेकापची उमेदवारी मिळविण्यात शिंदे यांना यश आले़ त्यानंतर मात्र दोन्ही कुटुंबात मनोमिलन झाले़ त्यानंतर चिखलीकर यांनी आपली संपूर्ण शक्ती शिंदे यांच्या विजयासाठी लावली होती़ शुक्रवारी झालेल्या पत्रपरिषदेत चिखलीकर यांनी शिंदे यांचा भाजपला पाठिंबा जाहीर केला़
श्यामसुंदर शिंदे यांनी मिळवला एकतर्फी विजयमन्याडखोऱ्यात तब्बल तीन दशकानंतर शेकापचा खटारा वेगात धावत विजयी झाला आहे. तर शिवसेनेचा गड ढासळला. श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, विक्रांत शिंदे यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवत, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करत पहिल्याच प्रयत्नात निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकण्याचा इतिहास रचला आहे. त्यांना चिखलीकर समर्थकांनी समर्थपणे साथ दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणूक रिंगणात प्रताप पा.चिखलीकर व शंकरअण्णा धोंडगे नव्हते. परंतु चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे व शंकरअण्णा यांचे पुत्र दिलीप धोंडगे व भाई डॉ. केशवराव धोंडगे यांचे पुत्र अॅड.मुक्तेश्वर धोंडगे निवडणूक रिंगणात होते. प्रवीण पा.चिखलीकर यांची भाजपा उमेदवारीची मोठी नामी संधी हुकली. परंतु, महायुतीची उमेदवारीची संधी अॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांना मिळाली. परंतु या संधीचा फायदा घेत त्यांना विजय मिळवता आला नाही. विधानसभा निवडणूक प्रचारात रा. कॉ., कॉग्रेस, मित्रपक्ष आघाडी, महायुती नावालाच राहिली. आपआपल्या सोयीनुसार विविध पक्षाचे पुढारी व कार्यकर्ते यांनी राजकीय कोलांटउड्या मारल्या. नेमके कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा ताळमेळ बसत नव्हता.