विष्णुपुरी येथील रुग्णालयात नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळसह शेजारील तेलंगणातून दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येतात. या ठिकाणी चांगली आणि विनाशुल्क सेवा मिळत असल्याने उपचारासाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा करण्यासाठीही तयार असतात. आजघडीला रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अवघड समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियाही होतात. परंतु शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टरच अनुपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय सेवेत असताना खासगीत सेवा करू नये, यासाठी या डॉक्टरांना त्यांच्या पगारातील बेसिकवर साधारणत: २० ते २५ हजार रुपये भत्ता दिला जातो. जर त्यांना खासगीत सेवा द्यावयाची असल्यास, हा भत्ता घेऊ नये असा नियम आहे. परंतु अनेक डॉक्टर्स हा भत्ताही घेतात अन् खासगीत रग्गड कमाईही करतात. जवळपास आठ डॉक्टरांनी तर नावानिशी रुग्णालये थाटली आहेत, तर काही जण इतर रुग्णालयांत जाऊन सेवा देतात. त्यामुळे गरीब रुग्णांचे मात्र हाल होतात. महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे त्यांना अनेक दिवस रुग्णालयातच पडून राहावे लागते. यापूर्वीही अनेकवेळा हा विषय ऐरणीवर आला आहे. परंतु कारवाई अद्याप कुणावरही केली नाही.
चौकट-
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अर्धवट ज्ञान
रुग्णालयात असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना रुग्णांशी संवाद कसा साधावा, कोणत्या आजारावर कसे उपचार करावेत याचे प्रात्यक्षिक ज्ञान हे त्या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळत असते. परंतु तज्ज्ञ डॉक्टरच दांडी मारत असल्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टर त्यापासून वंचित राहतात. त्यात डॉक्टर आणि रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये विसंवाद निर्माण होतो.
चौकट-
आमच्या रेकॉर्डवर कुणीच नाही
खासगी सेवा कुणी देत आहे काय, याबाबत आम्ही आठ ते दहा दिवसांपूर्वीच चौकशी केली आहे. परंतु आमच्या रेकॉर्डवर तसे कुणीच आढळून आले नाही, असा दावा महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी.जमदाडे यांनी केला आहे.
चौकट-
नर्सिंगच्या मुली कुठे ठेवणार?
महाविद्यालयात आता बी.एस्सी. नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया आहे. त्यात दीडशेपैकी साधारणत: ८० ते ९० मुलींचे प्रवेश होतात. परंतु या मुलींना राहण्यासाठी वसतिगृहच नाही. त्यामुळे या मुलींची व्यवस्था कशी करणार, हा प्रश्न आहे. दुसरीकडे बांधून तयार असलेल्या प्रशासकीय इमारतीचेही भिजत घोंगडे कायम आहे.